वसई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांग नागरिकांना ₹६,००० मासिक मानधन या प्रमुख मागण्यांसाठी हार जनक्रांती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्री वसई-विरारमध्ये आमदारांच्या निवासस्थानांसमोर तीव्र मशाल आंदोलन केले.

वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. हार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

या आंदोलनात महिला पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

हिते जाधव यांनी यावेळी "जय जवान, जय किसान" या माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या घोषणेची आठवण करून दिली आणि शेतकऱ्यांचा व दिव्यांगांचा हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.

शेवटी आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि आमदार राजन नाईक यांनी स्वतः घराबाहेर येऊन आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्या मागण्यांवरील निवेदने स्वीकारली आणि या प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.

पक्षाच्या आंदोलनाला दोन्ही आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर आंदोलकांनी शांततेत माघार घेतली. वसई-विरार परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे सामाजिक प्रश्नांवरील जनजागृतीचे एक सशक्त उदाहरण पाहायला मिळाले.