हितेंद्र ठाकूर यांचे सूचक विधान: तीन आमदार पक्के, चौथा आणि पाचवा ठरवण्याचे काम सुरू

वसई:विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "आमचे तीन आमदार नक्की निवडून येतील, मात्र चौथा आणि पाचवा कसा निवडून येईल, यासाठी काम सुरू आहे," असे वक्तव्य ठाकूर यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे नेमके कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. वसई पश्चिम येथील पंडित दीनदयाळ नगर येथे बहुजन विकास आघाडीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे, माजी सभापती संदेश जाधव, माजी नगरसेवक इकबाल हुद्दा, नितीन राऊत, माजी सभापती वृंदेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय वर्तक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पालघरमधून अनेक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, कोणकोणत्या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी उमेदवार उभे करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow