वसई: व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नवघर पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह ४ जणांना अटक केली आहे. तथापि, या प्रकरणातील मास्टरमाईंड वेगळाच असल्याचा आरोप तक्रारदार व्यावसायिक आकाश गुप्ता यांनी केला आहे. पोलिसांनी तपास करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वसईतील बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांच्या वरळीत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावर शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणाची निवृत्ती करण्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड करून खंडणीची रक्कम दिड कोटी रुपये ठरली. त्यानंतर, बांदेकर यांच्या वतीने हिमांशू शहा (४५) याने १५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेतला. शनिवारी रात्री मिरा रोड येथील बनाना लिफ हॉटेल मध्ये नवघर पोलिसांनी शहा याला सापळा लावून अटक केली.

त्यानंतर माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्याचे साथीदार किशोर काजरेकर व निखिल बोलार यांना नालासोपारा येथून अटक करण्यात आली. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तथापि, तक्रारदार आकाश गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी फक्त 'मोहरे' आहेत आणि खरा मास्टरमाईंड वेगळा आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, पुढे या प्रकरणाचा तपास करून मुख्य सुत्रधाराला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपींची पोलीस कोठडी बुधवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे आरोपी १० फेब्रुवारीपर्यंत नवघर पोलिसांच्या कोठडीत राहतील. या चौकशीतून प्रकरणातील सत्य उघड होण्याची शक्यता आहे.