नाशिक : गुन्हेगारीत वाढ, पंचवटीत युवकाचा खून; पोलीस तपास सुरू

नाशिक - नाशिक शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंचवटी परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ काल रात्री एका किरकोळ वादातून 29 वर्षीय विशांत भोये या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिरची पूड टाकून हल्ला
विशांत भोये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक काही महिलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांतवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात कोयत्याने छातीवर गंभीर वार केल्यामुळे विशांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेच्या दोन दिवस आधी लहान मुलांच्या वादातून हा वाद उद्भवला असल्याची प्राथमिक चर्चा आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला
गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावरही गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. कर्तव्यावरून घरी जात असताना गावगुंडांना हटकल्याने त्यांनी प्रकाश नेमाने यांच्यावर दगडाने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा
शहरात घडत असलेल्या सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकमध्ये नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकीच्या काळात पोलिसांवर हल्ला होणे आणि युवकाच्या हत्येसारख्या घटना राज्यभरात चिंतेचा विषय बनल्या आहेत.
What's Your Reaction?






