विधानसभेच्या दारुण पराभवानंतर, नाना पटोलेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ?

विधानसभेच्या दारुण पराभवानंतर, नाना पटोलेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ?

मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राज्यात महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत लाजीरवाणी ठरली असून, पक्षाला फक्त १६ जागांवरच यश मिळाले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे.

महायुतीची घवघवीत कामगिरी
यंदाच्या निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला आहे. त्यात भाजपने १३२ जागा, शिवसेना शिंदे गटाने ५७ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीचा सपशेल पराभव
महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. या आघाडीत काँग्रेसला फक्त १६ जागा, ठाकरे गटाला २० जागा, तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवरच यश मिळाले आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.

नाना पटोले राजीनामा देण्याच्या तयारीत?
काँग्रेसच्या या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले होते. २४ नोव्हेंबरला त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती मिळत आहे. मात्र काँग्रेस हायकमांडने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे सध्या नाना पटोले वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसते.

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली
या निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या दारुण पराभवामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow