मिरा-भाईंदर - भाईंदर पश्चिम परिसरातून सुमारे २५ लाख किंमतींची सोन्याची लगड चोरी करणाऱ्या दोन आरोपींना भाईंदर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मुद्देमालासह जळगाव येथून अटक केली आहे. 

फिर्यादी बाळकृष्ण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते बॅगेतून सोन्याची लगड घेऊन जात असताना आरोपींनी चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने त्यांची बॅग हातात घेतली त्यानंतर त्या बॅगेत काहीतरी मौल्यवान आहे याची कल्पना आल्यानंतर आरोपी ती बॅग घेऊन पसार झाले. फिर्यादींनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करत सीसीटीव्ही फुटेज मिळवत पुढील कारवाई करत मुख्य आरोपी सुनील निंबा पाटील (५६) आदर्श नगर ( जिल्हा ठाणे ) सदर फरारी आरोपीला त्याच्या मूळ गावाहून जळगाव येथून अटक करण्यात आलेली आहे. त्याचा दुसरा साथीदार रामानंद छोटेलाल यादव यालाही अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याकडून ३०० ग्रॅमची सोन्याची लगड जप्त केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३७६/२४ कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे अशी माहिती भाईंदर पोलीस स्टेशनचे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. 

मुख्य आरोपी सुनील पाटील याच्यावर याआधी देखील पाच गुन्हे दाखल आहेत पैकी तीन नवघर पोलीस ठाण्यात तर दोन ठाणे जिल्ह्यात दाखल आहेत. दोन्हीही आरोपी बोलबच्चन गॅंगचे असून हे आरोपी अनोळखी लोकांना पोलीस असल्याचे सांगतात, तसेच पुढे दंगल सुरु आहे वगैरे खोटी माहिती देऊन त्यांच्या मौल्यवान वस्तू आपल्या ताब्यात घेऊन मग फरार होतात अशीही माहिती गायकवाड यांनी दिली. या घटनेचा  पोलीस पुढील तपास करत आहेत. 

अशा घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहावे तसेच बँकेत जात असतानाही सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.