आषाढी एकादशी निमित्त अर्नाळा पोलीस ठाणे व शाळांमार्फत जनजागृती दिंडी व सायकल रॅलीचे आयोजन

आगाशी:५ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून अर्नाळा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आगाशी येथील एन. पी. शाह विद्यालय व के. जी. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी भव्य दिंडी व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.०० वाजता एन. पी. शाह विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व अर्नाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली उंबरगोठण नाका, कार्मेल स्कूल, जेलाडी वटार, क्रॉस नाका, आगाशी नाका मार्गे पुन्हा एन. पी. शाह विद्यालयात पोहोचून समाप्त झाली.
या सायकल रॅलीमध्ये अंदाजे ७५ ते ८० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, तसेच १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ५ पोलीस अधिकारी, ३० पोलीस अंमलदार व ५ मसूब जवान यांनी सहभाग घेतला. यापूर्वी, एन. पी. शाह विद्यालय व के. जी. हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांसह पोलिसांच्या सहभागाने आगाशी ते चाळपेठ नाका या मार्गावर जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत विद्यार्थ्यांनी हातात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबतचे पोस्टर व हँडबिल घेऊन सहभाग घेतला. या दिंडीमध्ये दोन्ही शाळांमधील एकूण २८० ते ३०० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. अंमली पदार्थविरोधी जनजागृतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होण्यास मदत झाली असून, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?






