राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांसाठी दिलासा! CCMP कोर्स पूर्ण केलेल्यांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेत सुरू

मुंबई, ४ जुलै – राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मॉडर्न फार्माकोलॉजी (CCMP) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची अधिकृत नोंदणी आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेत (MMC) केली जाणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या एलोपॅथी प्रॅक्टिसला कायदेशीर मान्यता मिळणार असून, डॉक्टरांसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
ही महत्वपूर्ण सुधारणा माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार अनिल गलगली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली. त्यांनी ११ मार्च २०२५ रोजी राज्य शासनाशी पत्रव्यवहार करून या नोंदणीबाबत ठोस मागणी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, "महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (सुधारणा) अधिनियम, २०१४" नुसार ही नोंदणी आवश्यक असून ती लांबणीवर पडत होती.
गलगली यांनी याचिकेत नमूद केले होते की २०१६ पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) मार्फत CCMP कोर्स राबवला जात आहे आणि १५,००० पेक्षा अधिक डॉक्टरांनी आतापर्यंत हा कोर्स पूर्ण केला आहे. नोंदणीची अंमलबजावणी झाल्यास, या डॉक्टरांच्या एलोपॅथी उपचारांना कायदेशीर आधार मिळेल आणि यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूलही वाचेल, असे त्यांनी निदर्शित केले.
डॉ. दिनेश साळुंके यांचे सहकार्य
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर डॉ. दिनेश साळुंके यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले. त्यांनी स्वतः अनिल गलगली यांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती दिली आणि शासन स्तरावर विविध अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत ही बाब सातत्याने पुढे नेली.
पूर्वी CCMP कोर्स नसलेल्या डॉक्टरांना एलोपॅथी औषधांचा वापर करण्याची कायदेशीर परवानगी नव्हती. मात्र आता, CCMP कोर्ससह नोंदणीची प्रक्रियाही सुरू झाल्यामुळे, संबंधित डॉक्टरांची प्रॅक्टिस अधिकृत, कायदेशीर आणि सुरक्षित ठरणार आहे.
हा निर्णय लाखो होमिओपॅथी डॉक्टरांसाठी नवा मार्ग आणि दिशा देणारा आहे. अनिल गलगली यांचा पुढाकार आणि जनहित याचिका निर्णायक ठरली असून, शासन, वैद्यक परिषद आणि आरोग्य विभागाने अखेर ही सुधारणा स्वीकारली.
What's Your Reaction?






