दुकानदाराला मारहाण : संतप्त व्यापाऱ्यांचा बंद; मीरा-भाईंदर शहरात स्वयंस्फूर्तीने बंदची हाक

मीरा रोड, ३ जुलै – जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानातील दुकानदारावर केवळ भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मीरा-भाईंदर शहरात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, बुधवारी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला निषेध नोंदवला. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, प्रशासनाकडून ठोस कृतीची मागणी केली जात आहे.
शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानात मनसे कार्यकर्त्यांकडून केवळ भाषा वापराबाबतच्या कारणावरून दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा निषेध करत व्यापाऱ्यांनी "व्यवसायाला संरक्षण मिळालंच पाहिजे" आणि "दादागिरीखोरांवर कठोर कारवाई करा" अशा घोषणा देत रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
सेव्हन इलेव्हन शाळेसमोर झालेल्या या आंदोलनात व्यापाऱ्यांसोबत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्थानिक व्यावसायिक संघटना, व्यापारी आणि नागरिक एकत्र आले. त्यांनी शांततेत, पण ठामपणे, भाषिक भेद आणि दहशतीच्या विरोधात आवाज उठवला.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीला सहन केले जाणार नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
या घटनेनंतर शहरातील विविध भाषिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. "जर भाषेच्या मुद्द्यावरून एखाद्यावर हात उचलला जात असेल, तर आमचं भवितव्य अंधारात आहे," अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाल्या. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
-
संबंधित आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी.
-
व्यावसायिकांना संरक्षण देणारी योजना लागू करावी.
-
राजकीय कार्यकर्त्यांची दबावगिरी थांबवण्यासाठी कठोर आदेश काढावेत.
पुढील कारवाईकडे शहराचे लक्ष
सध्या पोलीस तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण मीरा-भाईंदर शहराचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?






