पावसाळ्यासाठी महामुंबई मेट्रो सज्ज – मेट्रो २ए आणि ७ मार्गिकांसाठी व्यापक उपाययोजना राबविल्या

मुंबई, २७ मे २०२५ – पावसाळ्यात मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी आणि प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखावी यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी सर्वसमावेशक पावसाळी उपाययोजना राबवल्या आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि एमएमएमओसीएलचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या आराखड्यांत हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी अॅनिमोमीटर’ बसवले असून, प्रत्येक स्थानकावर ६४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्यात आले आहेत. पाणी साचू नये म्हणून डीवॉटरिंग पंप, लाइटनिंग अरेस्टर्स, यूपीएस यंत्रणा यांची तपासणी करण्यात आली आहे.
सर्व ३४ मेट्रो गाड्यांची वॉटरप्रूफ चाचणी पूर्ण झाली असून, व्हायाडक्ट, रूफ गटर्स आणि ड्रेनेज सिस्टीमची स्वच्छता करण्यात आली आहे. याशिवाय ७५९ हून अधिक इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्सची देखरेख पूर्ण झाली आहे.
स्थानिक उपाययोजना आणि व्यवस्थापन
प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र ‘इमर्जन्सी कोच’ सज्ज ठेवण्यात आला आहे. हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत आहेत: १८००८८९०५०५ / ०८०८ आणि ८४५२९०५४३४.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “मेट्रो सेवा सुरक्षित आणि अखंड राहावी यासाठी हे पावसाळी उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. मुसळधार पावसातही सेवा अबाधित राहील, याची खात्री करण्यात आली आहे.”
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमातून राज्य सरकारची प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी स्पष्ट केल्याचे सांगितले.
डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “अनपेक्षित परिस्थितीत तत्काळ सेवा उपलब्ध राहील, यासाठी राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.”
व्यवस्थापकीय संचालक श्रीमती रुबल अग्रवाल यांनी नमूद केले की, “संपूर्ण तयारीत ‘सुरक्षा प्रथम’ हाच आमचा दृष्टिकोन आहे.”
या उपाययोजनांमुळे मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यातही सुरक्षित, अखंड आणि कार्यक्षम मेट्रो सेवा मिळणार आहे.
What's Your Reaction?






