ठाणे, 12 जून : दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणारी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. फलाटांवरून अधिकृत मार्गाने प्रवेश न मिळाल्याने प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवरील बॅरिकेड्स चढून रेल्वेगाडीत प्रवेश करत आहेत, ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबईत नोकरी करणाऱ्या आणि कोकणाशी नाळ जोडलेल्या सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी दिवा परिसरात स्थायिकता स्वीकारली आहे. मुंबईजवळचा आणि तुलनेत स्वस्त पर्याय असल्यामुळे दिवा हे स्थलांतरित नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. परिणामी, येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली असून त्याचा थेट परिणाम स्थानकावरील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे.
प्रत्येक सकाळी ८ ते १०.३० या वेळेत स्थानकावर प्रचंड गर्दी होते, आणि फलाटांवर उभं राहायलाही जागा उरत नाही. त्यामुळे काही प्रवासी बेकायदेशीर मार्गाने बॅरिकेड्सवरून चढून, दोन्ही ट्रॅक ओलांडून थेट रेल्वेगाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिला प्रवासी आणि वृद्ध नागरिकांनाही यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा धावत्या रेल्वेगाडीत चढताना धक्काबुक्की होते, ज्यातून अपघात होण्याचा धोका अधिकच वाढतो.
दोन ट्रॅक दरम्यान असलेल्या कुंपणावरून चढणे, रेल्वेगाडीच्या लोखंडी पायऱ्यांवर पाय ठेवून प्रवेश करणे, ही दृश्ये आता नेहमीची झाली आहेत. सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचारी स्थानकावर असतानाही ही जीवघेणी कसरत उघडपणे सुरु आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते.
याठिकाणी आणखी एक गंभीर समस्या म्हणजे अनियंत्रित आणि बेकायदेशीर बांधकामांचे वाढते प्रमाण. कांदळवनात उभारलेल्या झोपडपट्ट्या, चाळी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांसह वाढलेली वस्ती दिवा स्थानकाच्या अव्यवस्थिततेस कारणीभूत ठरत आहे.
लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून या समस्येकडे तातडीने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Previous
Article