अहमदाबाद विमान अपघात: अनेकांच्या मृत्यूची भीती, गृहमंत्री अमित शहांचा घटनास्थळाचा आढावा

अहमदाबाद, १२ जून: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी होते. दुपारी 1:38 वाजता उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, 1:39 वाजता वैमानिकाने "मेडे कॉल" दिला. त्यानंतर काही क्षणातच विमान एका इमारतीवर आदळले आणि स्फोटानंतर परिसरात काळा धुराचा मोठा लोट पसरला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आपत्कालीन सेवा त्वरित घटनास्थळी पोहोचल्या असून, जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. आग विझवण्यासाठी किमान सात अग्निशमन बंब तैनात करण्यात आले आहेत. अपघातात अनेक मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र अजून अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही या फ्लाइटमध्ये होते, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे, परंतु यावर कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. सध्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय व एअर इंडिया यांनी चौकशी सुरू केली आहे.
ही घटना भारतीय विमान वाहतूक इतिहासातील आणखी एक दु:खद बाब ठरू शकते आणि लवकरच उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?






