रस्त्यावर मातीचा कहर! डंपरमुळे रस्त्यांची दुरवस्था, अपघाताचा धोका वाढला

भाईंदर – मिरा-भाईंदर परिसरात डंपरच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. डंपरमधून खाली पडणारी माती आणि राडारोडा रस्त्यावर साचत असून त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच कामांदरम्यान देखील नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात माती आणि टाकाऊ राडारोडा निर्माण होत आहे. यापूर्वी या राडारोड्याच्या योग्य विल्हेवाटीची कोणतीही सोय महापालिकेकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हा राडारोडा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागांमध्ये टाकत होते. काही महिन्यांपूर्वी शासनाने राडारोडा व्यवस्थापनासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून त्यानुसार महापालिकेने डंपर वाहतुकीसाठी नवीन नियमावली लागू केली आहे.
या नव्या नियमावलीनुसार डंपरमधील मलबा ताडपत्रीने झाकणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून रस्त्यावर मलबा खाली पडू नये. मात्र प्रत्यक्षात अनेक डंपर चालक हे नियम पाळत नाहीत. परिणामी रस्त्यावर माती पडत असून त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये या मातीमुळे घसरून दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे.
महापालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले असून नियमभंग करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई अपुरी असून समस्या तसतीच असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, भाईंदर पश्चिम येथील मांडवी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू असून त्यामध्ये तलावातील माती वाहून नेताना नियमांचे उल्लंघन होत आहे. डंपरमधून माती सर्रास रस्त्यावर पडत असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महानगरपालिका इतर विकासकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडते, मात्र स्वतःच्या कामांमध्येच नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
नागरिकांची मागणी:
शहरातील रस्त्यांवरील माती आणि राडारोडा तात्काळ हटवण्यात यावा, डंपर चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि महापालिकेने स्वतःच्या कामांमध्ये नियमांचे पालन करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






