ठाणे महापालिका क्षेत्रात १२४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई : शीळ परिसरातील १८ इमारती जमीनदोस्त

ठाणे, ३ जुलै — ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण विरोधी पथकाने १९ जूनपासून सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत एकूण १२४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शीळ परिसरातील एम. के. कम्पाऊंडमधील १८ अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या आहेत. ही मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि प्रभाग समिती निरीक्षण अहवालाच्या आधारावर सुरू आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार, नऊ प्रभाग समिती क्षेत्रांत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके बीट निरीक्षकांकडून प्राप्त माहितीच्या आधारे कारवाई करत असून, सुरू असलेल्या तसेच नवीन वाढीव अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात येत आहे.
उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळी, बैठी घरे, वाढीव शेड, आरसीसी इमारती, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडावून, टर्फ आदी अनधिकृत संरचनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हरित क्षेत्र, खाडी किनारे आणि अनधिकृत भू-भरणीवरही लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू आहे.
शीळ येथील एम. के. कम्पाऊंडमध्ये मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण २१ इमारतींवर निष्कासनाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १८ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, उर्वरित ३ इमारतींसाठी कारवाई सुरू आहे. ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे आणि सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
ही कारवाई पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कडेकोट बंदोबस्तात करण्यात आली. कारवाईसाठी जेसीबी, पोकलेन, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर आणि भरपूर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. अतिक्रमण व बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते आणि सहाय्यक आयुक्त यांचाही सक्रीय सहभाग होता.
कारवाईची आकडेवारी (१९ जून ते ३ जुलै २०२५)
-
नौपाडा-कोपरी : १०
-
दिवा : २८
-
मुंब्रा : १५
-
कळवा : १२
-
उथळसर : ११
-
माजिवडा-मानपाडा : २०
-
वर्तक नगर : १४
-
लोकमान्य नगर : १०
-
वागळे इस्टेट : ०४
एकूण : १२४ अनधिकृत बांधकामे
नियमित कारवाई सुरूच राहणार
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या मोहिमेची दैनंदिन आढावा बैठक घेत असून, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाया भविष्यातही अशाच पद्धतीने नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






