विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प रखडला; मार्च २०२७ पर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प रखडला; मार्च २०२७ पर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा

पालघर : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) महत्वाकांक्षी विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाला मोठा विलंब होत असून, हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर आवश्यक चाचण्या व रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CRS) मंजूरी घेतल्यानंतरच उपनगरीय सेवा सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

या प्रकल्पाची सुरुवात २०१६ मध्ये झाली असली तरी सुरुवातीला पूर्णत्वासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. कांदळवन (खारफुटी) तोडण्यास परवानगी, भूसंपादन आणि स्थानिक अडथळे यामुळे प्रकल्प सातत्याने रखडत गेला. विशेषतः पर्यावरण मंत्रालय व मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानग्या मिळवण्यास लागलेल्या वेळेमुळे अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला.

विरार ते डहाणू दरम्यान सध्या फक्त दोन मार्गावर गाड्या धावत असून लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्या याच मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दीचा आणि धोकादायक प्रवास करावा लागत आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याची खंत डहाणू-वैतरणा प्रवासी सामाजिक संस्थेने व्यक्त केली आहे.

प्रकल्पाचे काम विरार ते केळवा रोड आणि पालघर दरम्यान जोरात सुरू असले तरी बोईसर ते डहाणू दरम्यान नागरी वसती, पादचारी पूलांची कामे आणि रेल्वे यार्डाचे स्थलांतर यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः भिमनगर परिसरातील मालवाहतूक यार्डाचे स्थलांतर अद्याप प्रलंबित आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, समर्पित मालवाहतूक मार्ग, मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे यांसारख्या प्रकल्पांची माहिती अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. मात्र, विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाबाबत कोणतीही अद्ययावत माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे. प्रवाशांनी MRVC व रेल्वे प्रशासनाने संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर प्रगतीचे अपडेट्स नियमितपणे द्यावेत, अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow