वसई-विरारमध्ये पाणी कपातीचे संकट टळले; सुर्या, पेल्हार व उसगाव धरणांमध्ये मुबलक साठा

वसई : उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. मात्र वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे – सुर्या, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही प्रमुख धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा असल्यामुळे सध्या तरी पाणी कपातीची गरज भासत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाण्याच्या साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणांमध्ये अद्याप मुबलक साठा शिल्लक असल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सध्या पाण्याची पातळी समाधानकारक असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन आम्ही सर्व जनतेला करत आहोत."
वसई-विरार परिसरात पाण्याची मागणी उन्हाळ्यात लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आणि पुरवठ्याची निगराणी प्रशासनाकडून सतत केली जात आहे. आगामी काही आठवड्यांतही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, धरणांतील साठ्यावर लक्ष ठेवून नियोजन करण्यात येत आहे.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन स्थानिक जलपुरवठा विभागाने केले आहे.
What's Your Reaction?






