उद्धव-राज ठाकरे युतीवर निर्णय २९ एप्रिलनंतर; मनसेने स्पष्ट केले भूमिका

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठे वळण घेणारी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच मनसेनेते बाळा महाजन यांनी या विषयावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर असून, २९ एप्रिल रोजी ते मुंबईत परतणार आहेत. त्यानंतरच युतीसंदर्भातील अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असं महाजन यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, “ही फार संवेदनशील बाब आहे, त्यामुळे पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना यावर कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत.”
शिवसेना भवन (दादर) आणि विलेपार्ले परिसरात 'ठाकरे बंधूंनी एकत्र यावं' असा संदेश देणारे अनेक बॅनर्स लागले आहेत. ‘परळे पंचम’ या गटाने हे बॅनर्स लावले असून, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी नवी दिशा ठरवावी, अशी भावनिक मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होताच, राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला उधाण आले आहे.
“२१ एप्रिल रोजी संध्याकाळी पक्ष नेतृत्वाकडून स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत की, युतीसंदर्भात कोणताही पक्षप्रवक्ता किंवा नेते वक्तव्य करणार नाहीत. केवळ राज ठाकरेच यावर निर्णय घेतील आणि भूमिका मांडतील,” असं महाजन म्हणाले.
What's Your Reaction?






