मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून उभारण्यात आलेल्या नव्या कंटेनर शाखांमुळे भाजप व शिवसेना यांच्यातील कंटेनर वाद आणखी गंभीर होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वाद थांबण्याऐवजी अधिक तीव्र होत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

शिवसेनेकडून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर कंटेनरच्या माध्यमातून पक्षाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे १६ कंटेनर शाखा उभारण्यात आल्या असून, त्या सर्वच अनधिकृत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपसह इतर राजकीय पक्ष सातत्याने करत आहेत. मात्र, महापालिकेवर राजकीय दबाव असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजपनेही प्रतिउत्तर देत मिरा भाईंदरमध्ये स्वतःचे कंटेनर कार्यलय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, भाजपने थेट महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या निवासस्थानासमोर कंटेनर कार्यालय उभारून त्याचे उद्घाटन केले. यावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांची यादी तयार करत लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, वाद शांत होईल अशी अपेक्षा असतानाच, गुरुवारी रात्री पुन्हा एकदा शिवसेनेकडून मिरा रोडमधील भाग क्रमांक २० मध्ये नवीन कंटेनर उभारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अश्विन कसोदरिया यांना हे कंटेनर देण्यात आले असल्याचे समजते. मात्र, कसोदरिया यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

हा कंटेनर वाद आता केवळ स्थानिक राजकारणापुरता न राहता, प्रशासन, शासकीय निर्णयक्षमता आणि राजकीय दबाव यांच्या त्रिकोणात अडकलेला मुद्दा बनला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.