अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तपास सुरू

मुंबई:अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २३ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बोरीवली येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अक्षत सिंग बिस्ट (२३) हा तरुण मिरा रोडच्या बेव्हर्ली पार्क येथे राहतो. दोन दिवसांपूर्वी तो मालाडच्या एका टॅटू पार्लर मध्ये व्यस्थापक म्हणून रूजू झाला होता. ट्रेनने जाणे वेळखाऊ ठरणारे असल्याने तो दुचाकीने कामावर जात होता. रविवारी दुपारी अक्षत सिंग आपल्या दुचाकीवरून (एमएच ०४ एलके २४२७) घरी परतत होता. सव्वादोनच्या सुमारास बोरीवली येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येत असताना त्याला भरधाव वेगाने धडक दिली. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अक्षत याला कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना संध्याकाळी अक्षतचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आम्ही अज्ञात वाहनचालकाविरोधात मोटारवाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३४ (अ),१३४ (ब) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही फरार चालकाचा शोध घेत आहोत अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल शिंदे यांनी दिली.
What's Your Reaction?






