अवैध बांधकामांवर ठाणे महापालिकेची कारवाई; २८ नळजोडण्या खंडित, १९ बोअरवेल बंद, २ पंप जप्त

अवैध बांधकामांवर ठाणे महापालिकेची कारवाई; २८ नळजोडण्या खंडित, १९ बोअरवेल बंद, २ पंप जप्त

ठाणे – ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील अवैध बांधकामांवर कठोर कारवाई करत आज मोठ्या प्रमाणात नळजोडण्या खंडित केल्या आहेत. महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने दिवा, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य सावरकरनगर आणि उथळसर या प्रभागांमध्ये ही मोहीम राबवली. यामध्ये एकूण २८ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, १९ बेकायदेशीर बोरवेल बंद करण्यात आल्या आहेत. तसेच २ पंप जप्त करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांत ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये पाणीपुरवठा करताना नोंदवलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम हाती घेण्यात आली. या सर्व नळजोडण्या नियमबाह्य असून, त्यासाठी महापालिकेची कोणतीही अधिकृत मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणांमध्ये आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जलपुरवठा विभागाला दिलेल्या सूचनांनुसार, कोणत्याही अवैध बांधकामाला पाणीपुरवठा करताना त्यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी आणि बांधकाम अवैध असल्यास त्याची नळजोडणी तात्काळ खंडित करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच महापालिकेच्या जलवाहिनीवरून जर कोणीतरी अवैधरित्या नळजोडणी घेतली असेल तर ती देखील त्वरित तोडावी, असे आदेश देण्यात आले होते.

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष कारवाई करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या मोहिमेत एकूण ६१ इमारतींची पाहणी करण्यात आली. या इमारतींपैकी अनेक ठिकाणी अपूर्ण किंवा व्याप्त अनधिकृत बांधकाम आढळून आले असून तेथील नळजोडण्या तात्काळ तोडण्यात आल्या. काही ठिकाणी बेकायदेशीरपणे लावलेले पंपही जप्त करण्यात आले, तसेच बोरवेल बंद करण्यात आले.

महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असून कोणतीही गैरकायदा नळजोडणी महापालिका सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow