मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहराच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. यात मागील आठवड्याभरात हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय ) २०० पार गेला आहे. सातत्याने होणारे वातावरणातील बदल आणि बांधकामे यामुळे मीरा भाईंदरमधील हवेवर सातत्याने परिणाम होत आहे. यामुळे शहरातील असंख्य नागरिकांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. यात बांधकाम क्षेत्रातून पसरणाऱ्या धुळीचा त्रास सर्वाधिक आहे. त्यामुळे हे प्रदूषण नियंत्रणात आणायचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. 

मीरा भाईंदर शहरात हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु असून अनेक ठिकाणी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. यासाठी नियमांचे उल्लंघन करून सुरु असलेल्या बांधकाम क्षेत्राची यादी तयार करण्याच्या सूचना पालिका आयुक्त संजय काटकर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी नियमांचे पालन न करता सुरु असलेल्या १५ बांधकाम क्षेत्राची यादी तयार करण्यात आली आहे.

त्यानुसार या बांधकाम व्यवसायिकांना बांधकाम स्थळी पत्रे लावणे, रात्रीच्या सुमारास रेती झाकून ठेवणे, धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी फवारणी करणे आणि साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीचे टायर धुवून बाहेर काढणे आदी उपाय योजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर येत्या सोमवारपर्यंत (६ जानेवारी ) खबरदारी न बाळगणाऱ्या बांधकामावर थेट कारवाई करणार असल्याची माहिती आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.