मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने सर्वच्या सर्व १० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी झाली. पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवा सेना आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी आला. युवा सेनेने १० पैकी १० जागा जिंकल्याने प्रतिस्पर्धी अभाविपच्या उमेदवारांचा सुपडा साफ झाला.

युवा सेनेचे मयूर पांचाळ यांना ५३५० मते, तर प्रतिस्पर्धी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांना केवळ ८८८ मते मिळाली. युवासेनेच्या स्नेहा गवळी यांना ५९१४ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अभाविपच्या रेणूका ठाकूर यांना केवळ ८०३ मते मिळाली. शीतल शेठ देवरुखकर यांना ६४८९ मते मिळाली. त्यांनी अभाविपचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना १०१४ मते मिळाली. युवा सेनेच्या धनराज कोहचडे यांना ५२४७ मते मिळाली आहेत. अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा यांना केवळ ९२४ मते मिळाली. युवासेनेचे शशिकांत झोरे यांना ५१७० मते मिळाली आहे. त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. अजिंक्य यांना १०६६ मते मिळाली.

युवासेनेचे प्रदीप सावंत हे खुल्या प्रवर्गातून हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचे १३३८ हून अधिक मते मिळाली आहेत. सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी साधली आहे. युवासेनेचे उमेदवार मिलिंद साटम, परम यादव आणि किसन सावंत हे विजयी झाले आहेत. अल्पेश भोईर हे ११३७ मते मिळवून विजयी झाले आहेत.

ही सुरुवात आहे, असाच विजय मविआचा होईल - आदित्य ठाकरे

युवासेनेचे दहाच्या दहा उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सिनेटचे निकाल आपण पाहात आहात. सरकारने निवडणुकीत अडथळे निर्माण केलेत. ते निवडणुका हरतील त्यामुळेच कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील घेत नाहीत. जे विजयी झालेत त्यांचे अभिनंदन. मतदार राजाने आम्हाला साथ दिली. निवडणुका थांबवण्यासाठी मिंधेकडून सातत्याने प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. यासाठी कोर्टाचे आभार मानतो. हा निकाल सुरुवात आहे आणि असाच विजय महाविकास आघाडी प्राप्त करेल.