नायगांव : तिवरतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

नायगांव : तिवरतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

वसई - नायगाव पूर्वेतील कांदळवनावर कुऱ्हाड चालवून शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न काही दिवसांपूर्वी करण्यात आले. याबाबत तक्रारींची दखल घेत कांदळवन समितीने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाहणीनंतर आता तिवरांची कत्तल केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. 

नायगाव पूर्वेला सर्वे क्रमांक १०० ही शासकीय मिठागराची जागा असून त्याठिकाणी असलेल्या पश्चिम रेल्वेच्या खाडी पुला लगत बेकायदेशीर रस्ता बनवून येथील तिवरांची कत्तल करण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून, याबाबत स्थानिक प्रशासनासह अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुंबई यांना तक्रारी निवेदन युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी सादर केले होते. 

याबाबत तक्रारींची दखल घेत कांदळवन समितीने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. सदर कांदळवन समितीत नायब तहसीलदार शशिकांत नाचण, नायब तहसीलदार संतोष पांढरे, पालिका उपायुक्त अजित मुठे, मंडळ अधिकारी सुनील राठोड, वरिष्ठ लिपिक विनोद पवार, व वन विभाग डहाणू येथील कर्मचारी उपस्थित होते. 

कांदळवन समितीला प्रत्यक्ष जागेवर तीवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले आहे. तसेच येथील रेल्वे पूलाच्या पायाचे नुकसान करण्यात आल्याची गंभीर बाब स्पष्ट झाली आहे. सदर बाबत नायगाव पोलीस ठाण्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया करून या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow