वसई- पंतगाचा मांजा गळ्यात अडकून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. वसई पूर्वेच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. विक्रम डांगे असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर वसईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मकर संक्रातीचा सण जवळ आला असून यानिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. पतंगबाजीला आतापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहे.

परंतु पतंगबाजीसाठी नायलॉनच्या मांज्याचा वापर केला जात असल्याने तो धोकादायक ठरू लागला आहे. वसई पूर्वेच्या गोखिवरे परिसरात राहणारे विक्रम डांगे (३६) रविवारी संध्याकाळी ते पत्नी आणि मुलासह दुचाकीने मधुबन परिसरातून जात होते. मधुबन परिसरात पंतग उडविण्यात येत होत्या. यावेळी एका पतंगांचा माजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि ते खाली पडले. या मांज्यामुळे त्यांचा गळा चिरला गेला. त्यांना त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्याला ९ टाके घालण्यात आले असून प्रकृतिचा धोका टळला आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डांगे यांच्या गाडीचा वेग धीमा असल्याने मोठा अनर्थ टळला. सुरवातीला गळ्यात मांजा अडकल्याने ते खाली पडले. मात्र पतंग उडविणार्‍याने मांजा खेचल्याने गळा अधिक चिरत गेला असे डांगे यांच्या मित्राने सांगितले.विक्रम डांगे हे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आहेत. चीनी बनावटीचा नायलॉनचा मांजा घातक असतो. आनंदाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. यासाठी पारंपारिक मांजाचा उपयोग करणे आवश्यक आहे. या घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला इजा झाली, तर अनेक बालकांचे हात चिरले आहे. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना देखील इजा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य हरित लवादाने अशा मांज्याचा साठा करणे आणि विक्री करण्याला बंदी घातली आहे. मात्र बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर वसई विरार शहरात सर्रास वापर होत असलेला दिसून येत आहे. सध्या गल्लोगल्ली अनेक मुलांच्या हातात नायलॉन मांजा आणि गुंता झालेल्या नायलॉन मांजा रस्त्यावर पडलेला आढळून येत आहे. त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.