ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महापालिकेला इशारा, सात दिवसांची अल्टिमेटम

ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाणे महानगरपालिकेला थेट इशारा दिला आहे. राज्य सरकारने १४ मार्च २०२४ रोजी मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विना अनुदानित तसेच खासगी शाळा व आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शाळांचे फलक, दैनंदिन व्यवहार, सूचना इत्यादी सर्व काही मराठीतच असावे. मात्र, अद्यापही ठाणे महापालिकेच्या अखत्यारीतील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी फलकच लावलेले आहेत, असा आरोप मनसेने केला आहे.
मनसेच्या जनहित आणि कायदा विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागावर निष्क्रियतेचा आरोप करत सात दिवसांची अल्टिमेटम दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर या कालावधीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर मनसे आक्रमक आंदोलन छेडेल आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिका प्रशासनावर असेल.
महिंद्रकर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागावर चुकीची माहिती शाळांना पुरवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, शिक्षण विभागाने नुकतीच जी पत्रके शाळांना पाठवली, त्यात मराठी भाषा विभागाऐवजी शालेय व क्रीडा विभागाचा उल्लेख करण्यात आला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे. हे फक्त अज्ञानाचे नाही, तर दुर्लक्षाचेही लक्षण आहे, असे त्यांनी म्हटले. शासकीय आदेश स्पष्ट आहे – मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असून, तिचा शाळा व सार्वजनिक आस्थापनांमध्ये वापर बंधनकारक आहे. पण तरीही ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाची भूमिका ही या आदेशाच्या अंमलबजावणीविषयी अनास्था दाखवत आहे.
महिंद्रकर यांनी पुढे सांगितले की, केवळ महापालिकेच नव्हे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचीही जबाबदारी आहे की, प्रत्येक शाळेने मराठी भाषेचा वापर करण्याच्या आदेशाचे काटेकोर पालन केले पाहिजे. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून मराठीचा मान अबाधित ठेवण्यासाठी लढा उभारेल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






