मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या 'निर्भया पथक'ातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. या महिला पोलिसांनी दाखवलेल्या धैर्याची तुलना देवी दुर्गेच्या पराक्रमी आणि रक्षण करणाऱ्या रूपाशी करण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत X (पूर्वी ट्विटर) हँडलवरून निर्भया पथकाचे कार्य समाजात महिलां, मुलं आणि जेष्ठ नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरत असल्याचे नमूद करण्यात आले.

या पथकात पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका राजेंद्र पगारी, वंदना मधुकर पांडे, सीमा माचिंद्र कश्यप, सुषमा संदीप आंबेडकर, आणि अनीता अमितमाळी या अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी २०२१ पासूनच्या अनुभवांबाबत सांगितले.

निर्भया पथक हे केवळ तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देत नाही, तर शाळांमध्ये जाऊन 'चांगला स्पर्श - वाईट स्पर्श' यासारख्या संवेदनशील विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. कॉन्स्टेबल कश्यप म्हणाल्या, "आम्ही मुलींना सांगतो – गप्प बसू नका, काही चुकीचं घडत असेल तर पोलिसांना सांगा."

कॉन्स्टेबल पगारी यांनी त्वरित प्रतिसाद देण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, "महिलेचा फोन आला की ५ ते १० मिनिटांत पोचणं गरजेचं आहे."

या पथकाने हरवलेली मुले त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचेही अनेक प्रसंग शेअर केले. कॉन्स्टेबल आंबेडकर म्हणाल्या की, "कुर्ला परिसरात मुले हरवलेली आढळतात. आम्ही त्यांना आमच्या गाडीतून फिरवतो आणि घोषणांद्वारे त्यांच्या पालकांचा शोध घेतो."

कॉन्स्टेबल पांडे यांनी सांगितले की, एका वृद्ध महिलेला रात्रीच्या ड्युटीत सापडल्यावर तिच्या गावातील सरपंचाचा नंबर शोधून काढून, तिला मुलापर्यंत पोहोचवण्यात आले.

तसेच, कॉन्स्टेबल अमितमाळी यांनी सांगितले की, "आम्ही एका आठ वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला, जिने तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तिला बाबा रुग्णालयात दाखल केले आणि तिचा जीव वाचवला."

त्या अभिमानाने म्हणाल्या, "माझा गर्व आहे की मी मुंबई पोलीस दलाचा एक भाग आहे."