मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका: "मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून होणाऱ्या गतीची गरज नाही

मुंबई :राज्याच्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली आहे. महेश मांजरेकर यांच्या 'वॅको सॅनिटी – वाव में ट्रूथ' या यूट्यूब कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी मराठी भाषेच्या आणि मराठी अस्मितेच्या संदर्भात स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे शासनकर्त्यांनी व राजकारण करणाऱ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मराठीकडे पाहणं गरजेचं आहे. केवळ 'मराठी भाषा दिन' साजरा करून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून मराठीचा टिकाव लागणार नाही. जर मराठी माणसाच्या अस्तित्वावरच वरवंटा फिरवला जात असेल, तर अशी गती आम्हाला नको.”
ते पुढे म्हणाले, “आज जी शाळा सुरू होत आहेत, त्या फक्त IAS अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी आहेत. या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवू शकता, पण आपल्या इतिहासातून प्रेरणा द्यायची गरज भासत नाही का? क्रांतीचा उगम सांगता येत नाही? शिक्षणातून योग्य बोध देणं अत्यावश्यक आहे.”
राज्य सरकारने केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत त्रिभाषा सूत्र लागू करताना, इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयास अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.
राज ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करत, “हिंदी भाषा सक्तीने लादल्यास मनसे कदापिही सहन करणार नाही,” असा इशारा दिला. ते म्हणाले की, “शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांनाही त्या विद्यार्थ्यांना वाटू दिल्या जाणार नाहीत.”
राज ठाकरे यांनी १७ एप्रिल रोजी राज्य सरकारला यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला असून, वेळेवर निर्णय मागे घेतला नाही, तर संघर्ष अटळ असल्याचे सांगितले. “मराठी विरुद्ध मराठीतर संघर्ष उभा करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा डाव चालला आहे. पण मनसे हा डाव उधळून लावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मुलाखतीचा प्रोमो महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, संपूर्ण मुलाखत लवकरच 'वॅको सॅनिटी – वाव में ट्रूथ' या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध होणार आहे.
What's Your Reaction?






