वसई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ‘एआय’ करणार थेट दंड

वसई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता तुम्हाला वाहतूक पोलीस नव्हे, तर थेट कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) दंड पाठवणार आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी 'स्मार्ट ट्रॅफिक' उपक्रमांतर्गत एआय आधारित यंत्रणा सुरू केली आहे.
या यंत्रणेचा औपचारिक शुभारंभ एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांना एआय प्रणालीशी जोडण्यात आले असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची माहिती या प्रणालीद्वारे तात्काळ टिपली जाईल. त्यानंतर संबंधित वाहन क्रमांक ओळखून थेट मोबाईलवर दंडाचे चलान पाठवले जाईल. उल्लंघनाचे छायाचित्रही पुराव्यासह पाठवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की, "वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. एआयच्या मदतीने आता हे अधिक अचूक आणि जलदपणे करता येणार आहे."
सुरुवातीच्या टप्प्यात हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे आणि तिघे जण दुचाकीवर बसणे (ट्रिपल सीट) यासारख्या नियमांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात एकमार्गी रस्त्यावरून उलट दिशेने जाणे, चुकीच्या लेनमधून गाडी चालवणे आणि वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.
सध्या शहरात २०० एआय सक्षम कॅमेरे कार्यरत असून, आणखी ३,००० कॅमेरे बसवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी दिली.
या प्रणालीअंतर्गत एएनपीआर (ANPR) कॅमेरे देखील बसवले असून, ते वेगात असलेल्या वाहनांचे नंबर प्लेट तंतोतंत टिपतात. त्यामुळे अपघात करून पळून जाणाऱ्या किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा मागोवा घेणे अधिक सोपे होणार आहे.
मार्च महिन्यात या उपक्रमाचा प्रायोगिक वापर करण्यात आला होता आणि त्यात यश आल्यामुळे आता अधिकृत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






