विरार-खारवाडेश्री रो-रो सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु; अंतर व वेळेची मोठी बचत

विरार 18 एप्रिल 2025 : वसई तालुक्यातील खारवाडेश्री (जसार) ते विरारच्या मारंबळपाडा दरम्यानची रो-रो फेरीबोट सेवा 19 एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सागरमाला योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पाघर आणि विरार दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि इंधनबचतीचा ठरणार आहे.
या सेवेमुळे रस्तेमार्गे साधारण 60 किलोमीटरचे अंतर केवळ दीड किलोमीटर जलमार्गाने पार करता येणार असून, प्रवासाचा कालावधीही दीड तासांवरून केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. परिणामी नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.
ही सेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू होती. खारवाडेश्री येथे सध्या हंगामी जेट्टी तयार करण्यात आली असून, तिथे कायमस्वरूपी जेट्टीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 14 महिने लागणार आहेत. यासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या सेवेच्या उद्घाटनाची पहिली प्रायोगिक फेरी 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नारंगी येथून सोडण्यात येणार आहे. सेवा सध्या मे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवली जाणार आहे.
सेवेचा वेळ आणि वारंवारता
20 एप्रिलपासून सेवा सकाळी 6.30 वाजता सुरु होणार असून, शेवटची फेरी संध्याकाळी 7 वाजता खारवाडेश्री येथून निघेल. 25 एप्रिलपासून रात्रीच्या फेर्याही सुरू होणार असून, अखेरची फेरी रात्री 10.10 वाजता निघणार आहे. एका दिवशी सुमारे 21 फेर्या चालवल्या जाणार आहेत.
प्रस्तावित दररचना:
-
प्रौढ प्रवासी: ₹30
-
लहान मुले: ₹15
-
दुचाकी: ₹66
-
रिकामी रिक्षा: ₹110
-
चारचाकी वाहन: ₹200
-
मोठी वाहने: ₹220
-
प्राणी व मालवाहतूक (अर्धा टनापर्यंत): ₹30 - ₹40
प्रत्येक फेरीबोटमध्ये २० चारचाकी वाहने आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे.
ही सेवा सुरु झाल्याने विरार, वसई, सफाळे, केळवे भागातील रहिवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक मोठा दिलासा मिळणार असून, जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सुलभ होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने या सेवेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर लवकरच तिचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
What's Your Reaction?






