नालासोपाऱ्याच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या निनावी ईमेल मुळे खळबळ पोलिसांचा तपास सुरू

वसई:- नालासोपारा पश्चिमेच्या राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याचा निनावी मेल आला आहे. हा ईमेल बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास आला होता. या घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्थ येथे राहुल इंटरनॅशनल स्कूल व त्याच संस्थेचे मदर मेरी इंग्लिश हायस्कुल अशा दोन शाळा महाविद्यालये आहेत. या ठिकाणी पहिली ते बारावी पर्यँतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बुधवारी सकाळी साडे चारच्या सुमारास अचानक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मेल आयडी वर शाळेत बॉम्ब ठेवला असून शाळा बॉम्बने उडवू असा निनावी ईमेल आला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापक व शिक्षकांनी याची माहिती नालासोपारा पोलिसांना दिली.
या घटनेनंतर वसई-विरा महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, नालासोपारा सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे,नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, क्राईम ब्रँच युनिट तीनचे पथक, खंडणी विरोधी पथक, सायबर पथक दाखल होऊन तपास सुरू केला आहे. शाळेने सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळकरी मुलांना घरी पाठवून इमारती खाली केल्या आहेत. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला ही पाचारण केले आहे. या बॉम्बच्या संदर्भात आलेल्या ई मेलमुळे सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले आहे. यापूर्वी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ही निनावी ईमेल मुळे खळबळ उडाली होती. तसेच मिरारोड येथील एका शाळेत ही अशाच प्रकारे धमकीचा ईमेल आला होता. सातत्याने अशाप्रकारे धमक्यांचे ईमेल येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






