मिरा-भाईंदर : ४० लाखांच्या घरफोडीचा उलगडा, काशिमीरा पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

दोघे सराईत आरोपी गजाआड; सोनं-हिऱ्याचे दागिने, कार आणि कटर मशीनसह मुद्देमाल जप्त

मिरा-भाईंदर : ४० लाखांच्या घरफोडीचा उलगडा, काशिमीरा पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

मिरा-भाईंदर, २५ जून – काशिमीरा पोलिसांनी एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल ४० लाख १ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीप्रकरणी कैलास भगराज पटेल आणि मयुर राजकुमार रल्हाण या दोघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोनं-हिऱ्याचे दागिने, एक कार, तिजोरी फोडण्यासाठी वापरलेले कटर मशीन, तसेच गोदरेज कंपनीची तिजोरी जप्त करण्यात आली आहे.

फिर्यादी नुतन सुरजीत थीर (६०) हे काही दिवस बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उघडून घरातील बेडरूममध्ये ठेवलेली लाकडी कपाट आणि त्यात असलेली तिजोरी फोडून दागिने चोरून नेले होते.

प्रकरणाची गंभीर दखल घेत काशिमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. काही दिवसांच्या अथक तपासानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून

  • ₹३५,०१,५८८ किंमतीचे सोनं व हिऱ्याचे दागिने

  • ₹५,००,००० किंमतीची मोटार कार

  • तिजोरी कापण्यासाठी वापरलेले कटर मशीन

  • चोरीस गेलेली गोदरेज तिजोरी
    असा एकूण ₹४०,०१,५८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत, या आरोपींचा यापूर्वीच्या काही गुन्ह्यांशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यांचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

काशिमीरा पोलिसांच्या या कौशल्यपूर्ण कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले असून, अशा घरफोड्यांचे प्रमाण रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow