वसईत पार पडला आर्चबिशप थॉमस डिसोजा यांचा दीक्षाविधी सोहळा
प्रभू येशूच्या विचारांची ज्योत सर्वत्र पसरवून सर्वधर्म स्नेहभाव, प्रेम, ऐक्य, शांती स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

वसई - ख्रिस्ती समाजातील वसई धर्मप्रांताचे तिसरे आर्चबिशप थॉमस डिसोजा यांचा दीक्षाविधी सोहळा हा वसईतील स्टेला येथील सेंट अगस्तीन मैदानावर पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी वसईच्या धर्मप्रांताचे बिशप-एमेरिटस आणि आधीचे आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्यासह, डिसोजा यांना आशीर्वाद देण्यासाठी बॉम्बेचे आर्कबिशप आणि या दीक्षाविधी समारंभासाठीचे मुख्य ओसवाल्ड कार्डिनल ग्रेसियस उपस्थित होते. तसेच गोवा आणि दमणचे आर्कबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेराओ हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी मच्याडो यांनी सांगितले की, डिसोझा यांच्या हातून गरिबांची सेवा घडत राहील. सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याचे कार्य घडेल. तसेच ते वसईत प्रभू येशूचा मानवता आणि शांतीचा विचार पसरवतील असेही ते म्हणाले.
ख्रिसमस हा प्रकाशाचा सण
दीक्षाविधी सोहळ्यात आर्चबिशप थॉमस डिसोझा यांनीही आपले विचार मांडले. ख्रिसमस सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच ते म्हणाले की, प्रभू येशू यांनी मानवता, शांतीचा संदेश दिला. ख्रिसमस हा प्रकाशाचा सण आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे अंधकार आहेत. त्यामुळे आज प्रकाशाची गरज आहे. प्रभू येशूच्या विचारांची ज्योत सर्वत्र पसरवून सर्वधर्म स्नेहभाव, प्रेम, ऐक्य, शांती स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.
फादर डिसोजा हे वसई धर्मप्रांताचे तिसरे बिशप असून ते नंदाखाल धर्मग्रामाचे (पॅरीश) प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद जून २०२४ नंतर रिक्त होते. २००९ पासून फेलिक्स मच्याडो हे बिशप पद सांभाळत होते.
What's Your Reaction?






