वसई : वसई विरार शहरांमध्ये कबुतरांची वाढती संख्या व त्यामुळे होणारे विविध रोग ही गंभीर समस्या बनलेली आहे. पालिका प्रशासन यावर कुठलीच कारवाई व उपाययोजना करीत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अधिक माहितीनुसार , नवघर माणिकपूर प्रभागामध्ये अंबाडी रोड येथे पालिकेच्या कार्यालया समोरच कबुतरांना चणे विक्रेते आपल्या व्यवसायाकरता चणे व इतर पदार्थ खाऊ घालत असल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे नवघर माणिकपूर महानगरपालिकेचे कार्यालय समोर असतानाही हे बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत विशेष म्हणजे या पक्षांना नागरीकच खाऊ घालतात. त्यावर निर्बंध आणणे आवश्यक झालेले आहे. हजारो कबुतरांचे वास्तव्य या ठिकाणी निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथील स्कायवॉक कबुतरांच्या विष्ठेने भरलेला आहे. रस्त्याने येणारे जाणारे पादचारी, वाहनधारक वाहनतळात असणारी वाहने, यावर पडणारी विष्ठा सदर परिसरामध्ये गंभीर रोगांना आमंत्रण देणारी ठरणार आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लाज्मोसिस, बुरशीजन्य संसर्ग कॅन्डिडिआसिस, क्रिप्टोकोकोसिस नावाचा फुफ्फुसाचा रोग जो मध्यवर्ती मज्जासंस्थेला नंतरच्या टप्प्यावर प्रभावित करतो. हा घातक रोग आहे.दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी कबुतराची विष्ठा आणि पंख यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे आणि फुफ्फुसाचे जुनाट आजार यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे.डॉक्टरांनी नुकत्याच केलेल्या केस स्टडीने माहिती दिली आहे की, कबुतरांना खायला घालणे आणि त्यांच्या जवळ राहणे मानवांसाठी महत्त्वपूर्ण आरोग्य धोके निर्माण करू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. तसेच कबुरतांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचं दिसून आलं आहे. या आजारांचं वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर श्वसनमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात. पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी या परिसरात पक्षांना खाऊ घालू नये असे फलक लावले होते. जे आता गायब झालेले आहेत. सर्वप्रथम येथील चणे विक्रेत्यांवर गंडांतर आणणे अति आवश्यक झालेले आहे. याबाबत 'एच ' प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांच्याकडे विचारणा केली असता, सदर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील तसेच सदर व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.