वसई-विरारमध्ये ‘अग्निसुरक्षा सप्ताह’ साजरा : आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी जनजागृती रॅली आणि प्रात्यक्षिके

वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘अग्निसुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात आला. वाढत्या आग दुर्घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून, या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आग लागल्यास काय दक्षता घ्यावी, कोणते उपाय करावेत याची माहिती देणे हा होता.
या सप्ताहाचे उद्घाटन अग्निशमन जवानांना मानवंदना देत करण्यात आले. यानंतर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी संकुले, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुले आणि औद्योगिक भागात मॉक ड्रिल्स, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.
रविवारी, शहरात अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफा घेऊन भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त सदानंद पुरव, कार्यकारी अभियंता दीपक पाचंगे, अग्निशमन प्रमुख दिलीप पाव यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान सहभागी झाले होते.
या सप्ताहात अग्निसुरक्षा विषयक माहितीपत्रके, प्रात्यक्षिके तसेच आधुनिक यंत्रणांचे प्रात्यक्षिकही नागरिकांसमोर सादर करण्यात आले. यामध्ये ६४ मीटर उंचीची टर्नटेबल लॅडर आणि अग्निशमन रॉबोट यांचा समावेश होता.
अग्निशमन प्रमुख दिलीप पाव यांनी सांगितले की, २०२४ मध्ये साडेपाचशेहून अधिक आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शहरातील नऊ विभागांमध्ये पथके स्थापन करून सतत जनजागृती केली जात आहे.
विद्युत लेखापरीक्षण, अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी, नियमांची अंमलबजावणी यामुळे आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहून अग्निसुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
What's Your Reaction?






