नायगाव येथे महिलेवर सामूहिक बलात्कार

वसई: नोकरीसाठी पुण्यात आलेल्या महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याशिवाय महिलेची अश्लील छायाचित्रे तयार करून बनावट खात्यासह इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहेत. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील २ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. २८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी ती पुण्यात नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी आली होती. मात्र उशीर झाल्याने मुलाखतीची वेळ चुकली. यावेळी तिच्या पतीच्या परिचयाचा मित्र पवन याला संपर्क केला. तो तिला घेण्यासाठी पुण्याला आला आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर तो तिला नायगावच्या चंडिका माता मंदिर परिसरातील घरी घेऊन आला. तेथे त्याचे अन्य साथीदार धनराज चव्हाण, नागेश गायकवाड, अभिषेक पुजारी या चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
४ डिसेंबर ते ६ फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार घडला.यातील आरोपी पवन सब्बाद याने पीडित महिलेची अश्लिल छायाचित्रे काढून एका बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारीत करून तिची बदनामी केली. याशिवाय आरोपींनी तिचा मोबाईल, कानातील कर्णफुले असा ७५ हजारांचा ऐवज देखील बळजबरीने काढून घेतला. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पीडित महिलेने याप्रकरणाची फिर्याद अकोला जिल्ह्यातील डबकी रोड पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा नायगाव येथे वर्ग करण्यात आला आहे
What's Your Reaction?






