विरार : लोकनेते तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या यंग स्टार्स ट्रस्ट आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘आरती स्पर्धा` रविवार, 1 सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वाडवळ भजनी मंडळ, द्वितीय पारितोषिक समर्थ भजनी मंडळ आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री महालक्ष्मी प्रासादिक मंडळ यांना मिळाले. तर आरंभ आरती भजन मंडळ व उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय विवा कॉलेज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कै. भास्कर वामन ठाकूर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ यंग स्टार ट्रस्टचे समन्वयक अजीव पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी गणेशोत्सवाआधी ‘आरती स्पर्धे`चे आयोजन करण्यांत येते. यंदा या स्पर्धेचे 16 वे वर्ष होते. या वर्षीच्या स्पर्धेतूनही रसिक प्रेक्षकांना पारंपरिक आरतींची मेजवानी मिळाली. परीक्षक म्हणून मंगला मोहन परांजपे यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ समाजसेवक किरण ठाकूर, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, चिरायू चौधरी यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वीतेसाठी मिलिंद पवार, मिलिंद पोंक्षे, मुग्धा लेले, भूषण चुरी, तानाजी पाटील यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती समन्वयक अजीव पाटील यांनी दिली.