कामण-बेलकडी येथे अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

वसई : शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नायगाव पोलीस ठाण्यात आज ( ७ ऑक्टोबर) सकाळी दिलेल्या धडकेनंतर पोलिसांनी या प्रकरणात अखेर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी ही धडक दिली.
कामण-बेलकडी येथील अनधिकृत बांधकामाची भिंत पडून शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी एका मजुरासह एका बालिकेचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत अन्य तीन मजूर जखमी झालेले होते. मात्र संबंधित बांधकामधारक आणि वसई-विरार महापालिका, पोलीस प्रशासन यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. किंबहुना या घटनेतील मृतांच्या मृतदेहांवर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाय संबंधित अनधिकृत शेडही बांधकाम धारकांनी रातोरात बुलडोझरने पाडून व मलबा हटवून त्या ठिकाणी काहीच घडलं नाही, असं भासवत सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
विशेष म्हणजे; या घटनेतील तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना 'मॅनेज' करून डहाणू येथील त्यांच्या गावी नेऊन परस्पर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान; शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याना समजल्यानंतर त्यांनी ही माहिती जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार तेंडोलकर यांनी लागलीच याबाबतची माहिती पोलीस व पालिका प्रशासन यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र असा काही प्रकार घडला नाही, असं सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली.
मात्र अशी दुर्घटना घडली असल्याची पक्की माहिती असल्याने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुखाच्या वतीने नायगाव पोलीस ठाण्यात जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली धडक देणार असल्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
त्यामुळे धाबे दणाणलेल्या पोलीस प्रशासनाने लागलीच तपासाला सुरुवात केली. त्यानुसार डहाणू येथे जाऊन मृत बालकाच्या अस्थी जमा करून तशी नोंद केली. त्यांनतर या प्रकरणात चार जणांवर ४८३/२४, बीएनएस १०५, २३८, ३(५) प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान; या प्रकरणात हलगर्जी दाखवल्याने वसई-विरार महापालिका प्रभाग 'जी'चे प्रभारी सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करून; त्यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी केली आहे. अन्यथा; वसई-विरार महापालिकेविरोधातही लवकरच आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






