विरार पूर्व येथील चप्पल दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

विरार : पूर्वेच्या साईनाथ नगर भागात चप्पल दुकानांना सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळविले. विरार पूर्वेच्या भागात साईनाथ नगर परिसर आहे. या परिसरात चप्पल विक्रेत्याचे दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास दुकानाच्या जवळ झाडू मारून कचरा पेटविला होता. त्याची ठिणगी दुकानावर उडाली आणि भीषण आग लागली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती.
या आगीची माहिती येथील नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. दरम्यान; पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निबंबाच्या साहाय्याने अवघ्या तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे दुकान मालकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले आहे. मुख्य रस्त्यावरच ही दुकाने असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची दुर्घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. ***
What's Your Reaction?






