वसई-विरार महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्तीवर जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
वसई, १५ मे २०२५:वसई विरार शहर महानगरपालिका व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत आयोजित प्लास्टिक मुक्ती जनजागृती कार्यक्रम दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचा उद्देश प्लास्टिकमुक्त शहर घडवण्याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमात मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. इंद्रजीत गोरे, उपायुक्त श्री. नानासाहेब कामठे, तसेच विविध विभागाचे अधिकारी, नगररचनाकार व सल्लागार मान्यवर म्हणून उपस्थित होते. पर्यावरण विषयक सखोल मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती पूजा शिंदे या पर्यावरण कार्यकर्त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांचे वृक्षरोप व कॅप देऊन स्वागत करून करण्यात आली. यानंतर श्रीमती पूजा शिंदे यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणाम यावर सविस्तर माहिती दिली.
मुख्य अतिथी श्री. इंद्रजीत गोरे यांनी प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने महानगरपालिकेने घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे आवाहन केले.
‘एलाईड सोल्युशन सर्व्हिस’ संस्थेच्या कलाकारांनी प्रभावी पथनाट्य सादर करत “प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा” असा सामाजिक संदेश पोहोचवला. या सादरीकरणाने उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त श्री. विश्वनाथ तळेकर यांनी केले, तर उपायुक्त श्री. नानासाहेब कामठे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
What's Your Reaction?






