वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर कर्मचाऱ्यांचा ताण; फक्त १०५ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण विभागाची जबाबदारी

वसई : मागील काही वर्षांत वसई-विरार परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली असून, यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दीही बेसुमार झाली आहे. मात्र, या वाढत्या गर्दीची सुरक्षितता राखण्यासाठी व गुन्हेगारी आळा घालण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वसई रेल्वे पोलीस ठाण्याकडे नाही. सध्या केवळ १०५ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण ३१ किलोमीटरचा आणि सात रेल्वे स्थानकांची जबाबदारी आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १६१ पदे मंजूर आहेत, मात्र त्यापैकी केवळ १०५ कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित ५६ पदे रिक्त असून, या अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामकाज, गस्त, गुन्हेगारी तपासणी, अपघात व्यवस्थापन अशा अनेक बाबींवर परिणाम होत आहे. विशेषतः आठवड्याची सुट्टी, रजेवरील कर्मचारी, आकस्मिक अनुपस्थिती यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मीरारोड, भायंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा वर्दळीच्या स्थानकांचा समावेश आहे. दररोज २० ते २५ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. गर्दीसोबतच सोनसाखळी चोरी, पाकीटमारी, मोबाईल चोरी, छेडछाड, मारामारीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाणे सध्या लोहमार्ग पोलिसांच्या इमारतीत असून ते स्थानकापासून दूर आहे. यामुळे प्रवासी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. प्रवाशांच्या सोयीसाठी पोलीस ठाणे थेट रेल्वे स्थानकाच्या परिसरात असावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मत "वसई-विरारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यानुसार आम्ही वरिष्ठ पातळीवर मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली आहे. आवश्यक कर्मचारी मिळाल्यास गस्तीपासून गुन्हे तपासणीपर्यंत सर्व काम अधिक प्रभावीपणे करता येईल."
भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे
मनुष्यबळ स्थिती – आकडेवारीनुसार
पद | मंजूर | कार्यरत | रिक्त |
---|---|---|---|
वरिष्ठ पोलीस निरीक्षक | 1 | 1 | 0 |
पोलीस निरीक्षक | 1 | 1 | 0 |
सहा. पोलीस निरीक्षक | 2 | 1 | 1 |
पोलीस उपनिरीक्षक | 4 | 4 | 0 |
सहायक फौजदार | 12 | 3 | 9 |
हवालदार | 33 | 22 | 11 |
इतर कर्मचारी | 108 | 73 | 35 |
एकूण | 161 | 105 | 56 |
What's Your Reaction?






