वसई -नालासोपारा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

वसई -नालासोपारा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

वसई : विधानसभा निवडणुकीसाठी वसई आणि नालासोपारा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, वाहने, मंडप व्यवस्था, ईव्हीएम यंत्र, मनुष्यबळ नियोजन अशी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. वसई नालासोपारा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पणे पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रशासनाने तयारी केली आहे. १३३ वसई विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५४ हजार ६५२ तर १३२ नालासोपारा विधानसभेत ६ लाख ८ हजार ५२६ इतके मतदार आहेत. यासाठी वसईत ३५४ नालासोपाऱ्यात ५०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे.

याशिवाय नालासोपारा आणि वसई मिळून १०२७ इतकी ईव्हीएम यंत्र, याशिवाय एखाद्यावेळी तांत्रिक अडचण निर्माण झाली तर २० टक्के इतकी ईव्हीएम यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मतदान यंत्र व कर्मचारी यांची ने आण करण्यासाठी बस, जीप, कार, टेम्पो अशी छोट्या मोठ्या ३२६ वाहनांची सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय मतदान प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात येणार आहे. हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे.

नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मतदान केंद्रावर सोयीसुविधा मतदान केंद्रावर सावलीसाठी वसई, नालासोपाऱ्यात ८३ ठिकाणी मंडप उभारण्यात आले आहे. याशिवाय आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, अपंग मतदारांना ने आण करण्यासाठी व्हीलचेअर, पाळणाघर, प्रथमोपचार पेटी, आरोग्य पथक, वेटिंग रूम अशी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow