वसई-विरार महापालिकेचा 400 कोटींचा गैरव्यवहार उघड — ठेकेदारांच्या भूमिकेवर संशयाचे सावट

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा संकलन करण्याकामी महापालिकेने नव्याने तब्बल 300 कोटी रुपयांचे; किंबहुना त्याहून अधिक रकमेचे अंदाजपत्रक बनविलेले होते. त्याअनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून 11 ऑक्टोबर 2024 रोजी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेवर आक्षेप आल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. महापालिका उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज 850 मेट्रिक टन कचरा दररोज निघतो. हा कचरा पालिकेच्या गोखिवरे-भोयदापाडा सर्व्हे नंबर 30-हिस्सा क्रमांक अ -31, 32 या 19 हेक्टर जागेवरील क्षेपणभूमीवर जमा करण्यात येतो. हा कचरा आतापर्यंत पालिकेच्या विविध ठेकेदारांकडून जमा करून तो क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे. याकरता महापालिकेने विभागवार 20 ठेकेदारांची नियुक्ती केलेली होती.
सद्यस्थितीत पालिकेच्या क्षेपणभूमीवर 15 लाख टनाहून अधिक कचरा साचलेला आहे. या कचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन पालिकेने मागील वर्षी खरेदी केलेल्या 10 ट्रॉमील, पाच पोकलेन, 50 ट्रिपर, आणि दोन लाँग बूम, दोन शॉर्ट बूमच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा संकलन करण्यासाठी 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या त्रैवार्षिक वित्तीय वर्षाकरता मा. सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 26 दि. 20 फेब्रुवारी 2017 अन्वये प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेऊन ई-निविदा प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. सदर निविदाकारांची मुदत ही 28 फेब्रुवारी 2021 रोजी संपुष्टात आलेली होती. तत्पूर्वी प्रशासकीय ठराव क्रमांक 347 दिनांक 12 जुलै 2021 रोजी सन 2021-22, 2022-23, 2023-24, 2024-25, 2025-26 या पाच वर्षांकरिता निविदा मागवून प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेऊन दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु संबंधित निविदाकार यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी मा. उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर निविदेस स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल केलेली होती. तेव्हापासून आजपर्यंत वसई-विरार महापालिका सदर निविदाकारांना सातत्याने मुदतवाढ देत होती.
विशेष म्हणजे 2019 मध्ये वसई-विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांनी 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. कामगारांची 122 कोटींची रक्कम लाटल्या प्रकरणी 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात 2 मार्च 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात 3165 ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला होता. एकूण 122 कोटींच्या घोटाळ्यात 29 कोटी 50 लाख रुपयांचा शासकीय महसूलचाही समावेश होता. तर 92 कोटी 50 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे होते. पण या प्रकरणात अवघ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तर उर्वरित 23 ठेकेदार मोकाट होते. यात दैनंदिन रस्तेसफाई, गटारसफाई व कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे या ठेकेदारांना काळ््या यादीत टाकून नव्याने निविदा काढण्याची मागणी होत होती. सरतेशेवटी सात वर्षांच्या कालावधीनंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून 11 ऑक्टोबर 2024 रोजी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला 25 लाख इतकी आहे. साहजिकच शहरातील कचराही वाढलेला आहे. गटारांची संख्या वाढलेली आहे. वाढत्या कचऱ्याचे परिणाम म्हणून शहरात अनेक आजार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांची संख्या वाढवणे व नवीन ठेकेदारांना संधी देणे अपेक्षित होते. मात्र या निविदा प्रक्रियेत पुन्हा त्याच ठेकेदारांनी अर्ज केलेले होते. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदारांसह अनंत एंटरप्रायजेस, रिलायबल एजन्सी आणि उजाला लेबर कॉण्ट्रॅक्टर या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ठेकेदारांना बाद करण्याची मागणी भाजप विरार शहर मंडळ सरचिटणीस महेश कदम यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी 28 मार्च 2025 च्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही दाद मागितलेली होती.
दरम्यान; शहरातील घरे व आस्थापनांमधून कचरा संकलित करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सन 2021 पासून उपभोक्ता कर लागू केलेला आहे. एकूण मालमत्ता कराच्या पाच टक्के कर उपभोक्ता कर म्हणून घेतला जातो. घनकचरा व्यवस्थापनाचा 26 टक्के खर्च या करातून भागतो, असा पालिकेचा दावा आहे. असे असताना पालिकेने त्याच ठेकेदारांवर 400 कोटी रुपयांची उधळण करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळेही पालिकेच्या या निर्णयाला वसई-विरारकरांकडून तीव्र विरोध झालेला होता. या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने सरतेशेवटी ही निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.
What's Your Reaction?






