वसई-विरार महापालिकेच्या आरो विभागाला बनावट औषधांचा पुरवठा; वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाला धक्कादायक प्रकार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

वसई, १ जुलै: वसई-विरार महापालिकेच्या आरो विभागाला बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातिवली येथील माताबा संगोपन केंद्रातील औषधांच्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी संबंधित पुरवठादारांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरो विभागामार्फत नागरिकांना मोफत औषध व आरोग्य सेवा पुरवली जाते. या सेवेसाठी विविध पुरवठादार नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या मार्फत महापालिकेच्या रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि संगोपन केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो.
नुकत्याच औषध प्रशासनाच्या तपासणीत सातिवली येथील माताबा संगोपन केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या औषधांचे दहा अनौपचारिक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या तपासणीत संबंधित गोळ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीनंतर संबंधित पुरवठादारांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून औषधांचा साठा कुठून खरेदी करण्यात आला याची माहिती मागवण्यात आली, मात्र त्यांनी ती माहिती देण्यास टाळाटाळ केली.
याप्रकरणी मेणिक एंटरप्रायझेस व इतर सह पुरवठादारांविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), २७८, ३(५) आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० च्या कलम १७(ब) अंतर्गत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. बनावट औषधांचा पुरवठा केल्याने अनेक निरपराध रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. औषध प्रशासन व पोलीस विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी आणि दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
What's Your Reaction?






