रेल्वे स्थानकांवर वाशांची घुसमट: विरार ते मिरा रोडदरम्यान सुविधा अपुऱ्या, कामे अर्धवट, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

वसई/भाईंदर : विरार ते मिरा रोडदरम्यान असलेल्या रेल्वे स्थानकांवर वाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढती गर्दी, अर्धवट विकासकामे, गैरसोयी आणि सुरक्षेचा अभाव यामुळे रोज लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकांवरील अडथळे, अनधिकृत वाहनांची गर्दी, तसेच अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विरार ते चर्चगेटदरम्यान दररोज जवळपास २० ते २५ लाख प्रवासी प्रवास करतात. यात नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी वर्ग आणि महिला प्रवाशांचा समावेश आहे. मात्र स्थानकांवरील सुविधा त्या तुलनेत अत्यंत तोकड्या असल्याचे चित्र आहे.
मिरा रोड, भाईंदर, नायगाव, नालासोपारा, वसई आणि विरार या स्थानकांवर सध्या फलाटांवर विविध विकासकामे सुरु आहेत. मात्र या कामांना योग्य नियोजनाचा अभाव असून फलाटांवर लोखंडी खांब, पत्रे, तसेच उघडी पडलेली जागा यामुळे प्रवाशांच्या चढउतारीत अडथळे येत आहेत. विरार स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ अ आणि ४ अ वर पादचारी पूलच नाही. त्यामुळे प्रवाशांना संपूर्ण फलाट चालत पार करावा लागतो, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
नालासोपारा स्थानकावर शौचालयांची कमतरता असून पूर्वेकडील जिन्यांच्या खाली व मोकळ्या जागेत प्रवासी लघुशंका करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नायगाव स्थानकावरही शौचालयाचा अभाव, भुयारी मार्गातील घाणीचे साम्राज्य, भटकी कुत्री आणि अपुऱ्या तिकीट खिडक्या या समस्या गंभीर बनल्या आहेत.
वसई स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर वारांगणांचा वावर मोठ्या प्रमाणात असून त्याचा महिला प्रवाशांवर मोठा परिणाम होत आहे. तसेच स्थानकावर असलेल्या स्कायवॉकवरही असुरक्षिततेची भावना असून गर्दुल्ल्यांच्या उपस्थितीमुळे अनेक प्रवासी त्याचा वापर टाळत आहेत.
मृदुला खेडेकर या महिला प्रवाशांनी सांगितले की, “वाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.” रात्रीच्या वेळेस महिला प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, प्रत्येक स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरार ते मिरा रोडदरम्यान रेल्वे स्थानकांवरील वाशांच्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. अर्धवट विकासकामे, अपुरी मूलभूत सुविधा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलून प्रवाशांच्या सुविधांबाबत ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
What's Your Reaction?






