वसईत तलावात दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले; हत्या असल्याचा संशय व्यक्त

वसई - वसईतील भालिवली येथील एका तलावात शनिवारी दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हा अपघाती मृत्यू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समोर येणार आहे.
मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून पवन बोडके (१९) हा कुर्ला येथे राहत होता तर तुषार बेंगुडे हा नालासोपाऱ्याचा रहिवासी होता. दोघेही विलेपार्ले येथील महाविद्यालयात तृतीय वर्षाचे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. शुक्रवारी बोडके नालासोपारा येथे बेंगुडे याला भेटण्यासाठी गेला आणि त्यांनी दुचाकीने भटकंती करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. मात्र, आपण कुठे जात आहोत याची माहिती त्यांनी बेंगुडेच्या कुटुंबीयांना कळविली नाही.
संध्याकाळी दोघे घरी न परतल्याने बेंगुडेच्या वडिलांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही फोन बंद होते. त्यांनतर कुटुंबीयांनी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली, मात्र त्यांना कोणतीच माहिती कळली नाही.
कुटुंबीयांनी बेंगुडेचे लोकेशन ट्रेस केल्यांनतर ते वसई पूर्वेला त्यांच्या घरापासून २० किमी भालिवली येथे दूरवर दाखवत होते. त्यामुळे या घटनेला गंभीर वळण प्राप्त झाले. तिथे पोहोचल्यावर एका जलाशयाजवळ दुचाकी आढळून आली. घटनास्थळी पोहोचल्यावर, ग्रामस्थांनी शुक्रवारी बोडकेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मात्र, अंधार झाल्यामुळे बेंगुडेच्या शोधासाठी मोहीम थांबवण्यात आली. शनिवारी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. बेंगुडेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला.
पोलिसांनी सांगितले की, दोन्हीही विद्यार्थ्यांना पोहता येत नव्हते. तसेच घटनास्थळी त्यांचे कपडे आणि इतर सामान सापडेल नाही, यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. हा तलाव अशा जागी आहे जिथे फारसा कुणाचा वावर नसतो तसेच याचा वापर पोहोण्यासाठी फारसा केला जात नाही. तसे याआधी इथे असे अपघाती मृत्यू नोंदविले गेले नाहीत. हा अपघाती मृत्यू असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली असून ते पुढील तपास करत आहेत.
पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दोन्हीही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
What's Your Reaction?






