नालासोपारा : तुळींज पोलीस स्टेशनचा प्रश्न अखेर मार्गी

वसई- नालासोपार्यातील तुळींज पोलीस ठाण्याच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तुळींज येथील पालिकेच्या मैदानातील २० हजार ६८४ चौरस मीटर जागा तुळींज पोलीस ठाण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. या जागेच्या भूसंपादनासाठी बाजारभावानुसार पालिकेला साडेतीन कोटी रुपये देण्यासाठी गृह विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नालासोपार्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तुळींज पोलीस ठाणे तयार करण्यात आले. नालासोपारा पूर्वेच्या रेल्वे स्थानाकासमोर असलेल्या नाल्यावरील चौकीचे रुपांतर पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. परंतु ही जागा अपुरी असल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. पोलीस ठाण्यात कर्मचारी आणि अधिकार्यांना बसायला पुरेसे कक्ष नाहीत. पोलीस ठाण्यात येणार्या अभ्यागतांना देखील बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे दाटीवाटीने टेबल लावून कर्मचारी काम करत असतात. जागा अपुरी असल्याने अनधिकृतपणे वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. त्यात कसल्याच सोयी सुविधा नव्हत्या. पोलीस ठाणे नाल्यावर असल्याने पावसाळ्यात पोलीस ठाण्यात पाणी साचत असते. त्यामुळे कागदपत्रांचे देखील नुकसान होत असते. या समस्या लक्षात घेऊन तुळींज पोलीस ठाण्याच्या नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला होता.
नालासोपारा पूर्वेला असलेल्या तुळींज येथे (मौजै तुळींज, भूमापन क्रमांक ८६) येथे पालिकेची २० हजार ६८४ चौरस मीटर जागा मैदानासाठी आरक्षित आहे. या मैदानातील ३ हजार १८३ चौरस मीटर जागा तुळींज पोलीस ठाण्यासाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र ती जागा पोलिसांना मिळाली नव्हती. परिणामी जागा असूनही पोलीस ठाण्याच्या निर्मितीत अडथळे येत होते.
पोलीस ठाण्याच्या भूसंपादनासाठी निधी मंजूर
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी जागा ताब्यात घेण्यासाठी गृहखात्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर या जागेचे तुळींज पोलीस ठाण्यासाठी भूसंपादन करण्यास पोलीस गृहविभागाने मान्यता दिली आहे. चालू बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत ३ कोटी ५६ लाख रुपये एवढी होते. ती रक्कम पालिकेला देण्यासाठी गृह विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नुकताच याबाबतचा शासन निर्णय मंजूर करण्यात आला आहे. जागा ताब्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तुळींज पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे. ही इमारत तयार झाल्यास पोलीस आणि नागरिकांची गैरसोयीतून सुटका होणार आहे.
What's Your Reaction?






