वसई:गुन्हे शाखा १ च्या पथकाने एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २२ कोटी ३३ लाख रुपयांच्या कोकेनसह दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून, यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. कोकेन हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात मानवी शरीराच्या माध्यमातून तस्करी करून आणले गेले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

या कारवाईत भाईंदर येथून सबीना शेख (४२) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडे सुमारे ११ किलो वजनाचे, १७ कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत, तिचा संबंध वसईतील नायजेरियन नागरिकांशी असल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले, ज्यामध्ये एक महिला देखील आहे.

या तिघांकडून एकूण १४ किलो कोकेन, तसेच अमेरिकन व नायजेरियन चलनाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण जप्त मालमत्तेची किंमत २२.३३ कोटी रुपये इतकी आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोद बडाख यांनी माहिती दिली की, हे कोकेन आफ्रिकेतून भारतात कॅप्सूल स्वरूपात मानवी शरीरात लपवून – विशेषतः पोटात ठेवून – आणले गेले होते. पोलिस सध्या या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

ज्यात अटकेत आलेली तिसरी महिला आरोपी नायजेरियन असून ती वसईतील एरशाईनच्या महे पार्क इमारतीत राहत होती. ही इमारत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा अड्डा बनली आहे. तिला घर भाड्याने देणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे बडाख यांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ निरीक्षक मोद बडाख, पो.उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, तसेच फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा आदींनी सहभाग घेतला.

ही पंधरा दिवसांत वसई-विरार परिसरातील दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी, गुन्हे शाखा २ ने वसई येथून एका नायजेरियन नागरिकाला ११ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक केली होती.

जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान, पोलिसांनी २३३ ठिकाणी छापे टाकून ५० जणांना अटक केली, आणि ५.५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. एप्रिल महिन्यातच आतापर्यंत १२ कोटी रुपयांचे कोकेन व अन्य ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम सुरु असून, आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी तपास सुरू आहे.