इमारतीवर चढून मद्यधुंद अवस्थेत स्टंटबाजी; नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना टळली

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका इसमाने मद्यधुंद अवस्थेत चार मजली इमारतीवर चढून स्टंटबाजी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वेळेवर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
ही घटना सोमवार (दि. १४ एप्रिल) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पश्चिम येथील बबली अपार्टमेंट येथे घडली. संजय घायाळ (वय ४५), साखरपाडा वसई येथील रहिवासी, असे या व्यक्तीचे नाव असून, तो मद्याच्या नशेत सदर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढून बसला होता. या अवस्थेत त्याने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पुष्कर मकवाना, बस्त्याव तुस्कानो, योगेश म्हात्रे, निखिल भोईर आणि नालासोपारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. योग्य नियोजन आणि धाडसाने त्यांनी संजय घायाळ याला सुखरूप खाली उतरवले.
या घटनेची नोंद नालासोपारा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागरिकांनी अशा घटनांबाबत तत्काळ माहिती देऊन मदत केल्याने एक अनर्थ टळला, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर प्रकारातून मद्यपानामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची जाणीव होऊन नागरिकांनी सजग राहावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
What's Your Reaction?






