विरार : विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे एका दुकानाची भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि जीर्ण इमारतींवर परिणाम होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर सहकार नगरमधील एक दुकान धोकादायक स्थितीत असल्याने त्याची भिंत कोसळली.
पावसामुळे दुकान परिसरात त्या वेळी कोणतीही हालचाल नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत होती आणि अनेक वेळा संबंधित विभागाचे लक्ष वेधूनही योग्य उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या.
घटनेनंतर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मलबा हटवून परिसर सुरक्षीत केला. या घटनेनंतर परिसरातील इतर धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.
Previous
Article