पालिकेची सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामविरोधी धडक मोहीम!

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई करण्यात आली. बुधवार, 18 सप्टेंबर रोजी पालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरणाने केलेल्या कारवाईत विरार-खैरपाडा गाव येथील तब्बल 7 हजार चौरस फूट औद्योगिक शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी प्रभाग समिती ‘डी`मधील सर्व्हे क्रमांक- 6 मधील 2 हजार चौरस फूट पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले. याशिवाय या प्रभागातील लिंक रोड, डी मार्ट, अग्रवाल नाका, गाला नगर येथील अंदाजित 125 ते 130 अनधिकृत टपऱ्याही काढून टाकण्यात आल्या.
वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार (भाप्रसे) यांच्या आदेशानुसार,वसई-विरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार; अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व उपायुक्त अजीत मुठे यांच्या नेतृत्वात प्रभाग समिती ‘डी`मध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांचाही प्रामुख्याने सहभाग राहिला.
दरम्यान; विरार-खैरपाडा-विरार फाटा येथील कारवाई विशेष नियोजन प्राधिकरणाच्या सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत ठेका अभियंता हिमांशू राऊत, लिपीक हेमंत मेहेर आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






